राजकीय हालचालींना वेग, शिंदे गटाचे खासदार-आमदार यांची सुरक्षा का वाढवली?
शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेत वाढ झाल्याने पुन्हा एकदा राजकीय हालचाली तेजीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
कृष्णा सोनरवाडकर, मुंबईः आमदार रवी राणांचे (Ravi Rana) आरोप, बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शिंदे-फडणवीसांसह राणांना दिलेलं आव्हान आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड राजकीय हालचाली सुरु आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या प्रतिक्रियांतून एकमेकांबद्दल राग, नाराजी, धुसपूस दिसूनच येतेय. मात्र पडद्यामागेदेखील प्रचंड राजकीय खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच घडामोडींमध्ये आज आणखी एक घडामोड म्हणजे शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना X वरून Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही ही वाढ झाली आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने ही सुरक्षा प्रदान करण्यात येते. राहुल शेवाळे यांच्यासह 11 खासदार तसेच 41 आमदारांसाठी पोलीस कर्मचारी आणि पोलीस व्हॅनची सुरक्षा अधिक देण्यात आली आहे.
याच राजकीय हालचालींमध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा गुवाहटीला जाण्याची चर्चा आहे. तर काहीजण अयोध्येलाही जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकारतर्फे कपात करण्यात आली. यात उद्धव ठाकरे गटाचे आमदार, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांचाही समावेश आहे. मात्र आता सत्ताधारी शिंदे गटातील नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
भाजपचे आमदार रवी राणा यांनी शिंदे गटातील आमदारांवर खोके अर्थात पैसे घेतल्याचा आरोप केलाय. यावरून शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यासह फडणवीस यांनाच आव्हान दिलंय. आम्ही पैसे घेतल्याचं सिद्ध करून दाखवा, राजीनामा देतो, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.
एकिकडे आज रवी राणा- बच्चू कडू यांच्यातील वाद निवळण्याची शक्यता दिसून येतेय. काल रात्रीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची बैठक सुरु आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना अपेक्षित स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
तर मात्र दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेत वाढ झाल्याने पुन्हा एकदा राजकीय हालचाली तेजीत असल्याचे संकेत मिळत आहेत.