मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईच्या ‘या’ नव्या मिशनबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी दिली मोठी माहिती
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथे वाहतुक सुधारणा प्रकल्पांतर्गत मानखुर्द-ठाणे दिशेकडील उड्डाणपुलाचे लोकार्पण
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथे वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत मानखुर्द-ठाणे दिशेकडील उड्डाणपुलाचे लोकार्पण झालं आहे. सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता आणि पूर्व मुक्त मार्ग पूर्ण झाल्यानंतर, मुंबईच्या काही भागातून ठाण्याकडे जाणारी वाहतूक घाटकोपर येथील छेडानगर जंक्शनवर जमा होऊ लागली होती. त्यामुळे तेथे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी प्राधिकरणाने छेडानगर जंक्शनच्या सुधारणेचा प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान, पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये, मुंबईतील रस्त्यावर पाणी तुंबणार नाही यासाठी सरकार काळजी घेत असून यंत्रणा सज्ज आहे. पावसात बऱ्याचदा मुंबईतील रस्त्यावर खड्डे पडल्याचे पाहायला मिळते. मात्र खड्डेमुक्त मुंबईचं मिशन आम्ही हाती घेतलंय, त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ६ हजार कोटींचं काम सुरू केले असून पुढच्या दोन अडीच वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार, एकही खड्डा मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नसल्याची ग्वाही देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.