वडिलांची चप्पल घालून परांजपेंनी वडिलांसारखं काम करावं, Eknath Shinde यांचं परांजपेंना प्रत्युत्तर

वडिलांची चप्पल घालून परांजपेंनी वडिलांसारखं काम करावं, Eknath Shinde यांचं परांजपेंना प्रत्युत्तर

| Updated on: Jan 16, 2022 | 7:51 PM

ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील रंगलेला कलगीतुरा काही थांबताना दिसत नाही. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी त्यावर पलटवार केला आहे.

ठाणे: ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील रंगलेला कलगीतुरा काही थांबताना दिसत नाही. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी त्यावर पलटवार केला आहे. 2014 नंतर खारीगाव रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन बदलले असले तरी खासदार शिंदे यांचे श्रेय राष्ट्रवादी घेऊ इच्छित नाही. पण, त्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे. मराठीत एक म्हण आहे, बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही. आव्हाड हे मुलासमान प्रेम करतात; पण, मुलाच्या यशाने पोटदुखी होईल, अशी राष्ट्रवादीची भावना नाही, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदे यांना चपराक लगावली आहे.

आनंद परांजपे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला. कालच कळवा येथील खारीगवा उड्डाणपुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नरेश म्हस्के उपस्थित होते. काल डॉ. आव्हाड यांनी पुलाच्या उभारणीबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली होती. त्यानंतर लगेचच नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. वैयक्तीक टीका करु नका, असा सल्ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. मात्र, हाच सल्ला या दोघांनी पाळलेला नाही. काय करावे आणि काय करु नये, हा त्यांच्या संस्कृतीचा आणि संस्काराचा भाग आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका होत असताना त्यास प्रखर विरोध करणे, हे आमचे कर्तव्यच आहे. शनिवारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आव्हाड यांनी नरेश म्हस्के यांना नारदमुनीची उपमा दिली. पण, हीच उपमा समजण्यात म्हस्के यांची चूकच झालेली आहे. कारण, ते कलियुगातील नारद आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून भविष्यात काही चांगले घडेल, अशा प्रकारची अपेक्षा करणेच फोल आहे, असा हल्ला परांजपे यांनी चढवला.

Published on: Jan 16, 2022 07:51 PM