रवी खरात, मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) गट या शिवसेनेतील दोन गटांना निवडणूक आयोगाने नवी नावं दिली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) हे नवं नाव देण्यात आलंय. नवी मुंबईत आज याच नावाचं पहिलं पोस्टर झळकलंय.
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांनी आज नवी मुंबईत मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलं.
या उद्घाटन समारंभाला कार्यालयाबाहेर पक्षातील नव्या गटाला मिळालेलं नाव मोठ्या बॅनरवर झळकवण्यात आलंय. त्यामुळे संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात या बॅनरची चर्चा आहे.
अशोक गावडे यांच्या या कार्यालयाचा आज उद्घाटन सोहळा झाला. यासाठी शिंदे गटाचे विजय चौगुले आणि विजय नहाटा हेदेखील उपस्थित होते.
नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात आज काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश करण्यात आला. त्याामुळे हे कार्यालय आज जोरदार चर्चेत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालंय. त्यांना धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आलंय.
ठाकरे गटाच्या या नव्या चिन्हाचं आज संपूर्ण महाराष्ट्रभर स्वागत करण्यात आलं.