सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी ‘या’ तारखेला, आज कोर्टाचे आदेश काय?
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या बहुचर्चित खटल्याची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली
संदीप राजगोळकर, नवी दिल्लीः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टासमोर दोन्ही गटातर्फे युक्तिवाद झाले. कोर्टाने दोन्ही पक्षकारांना आपापले युक्तिवाद लिखित स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. तीन आठवड्यात यासंदर्भातील कागदपत्र दाखल करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी आता 29नोव्हेंबर रोजी म्हणजेच चार आठवड्यांनी ठरेल. 29 नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी कोणती तारीख द्यायची, हे सांगितलं जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहेत.
आज कोर्ट काय म्हणालं?
- सदर खटल्यात सुनावणीपूर्वी दोन्ही पक्षांच्या मुद्द्यांच्या नोंदी आम्हाला ठेवायच्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी संकलित स्वरुपात एकत्र फाइल तयार करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांना दिल्या आहेत.
- दोन्ही बाजूंच्या कनिष्ठ वकिलांना ही प्राथमिक मांडणी करता येईल. तसेच लिखित स्वरुपाच्या संकलनाचा दुसरा भागही ते सादर करू शकतील.
- कोण कोणत्या मुद्द्यावर युक्तिवाद करणार, हे दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे ठरवावे. यात 25 मुद्दे अर्थात भरमसाठ मुद्दे नसावेत. एकमेकांचे मुद्दे ओव्हरलॅप होतील, अशा प्रकारे मुद्दे मांडू नयेत, अशा स्पष्ट सूचना कोर्टाने दिल्या आहेत.
- नोंदी ऐकणे आणि नोंदी ठेवण्यात वेळ जातो, त्यामुळे लिखित स्वरुपातील या नोंदी आम्हाला जास्त मदत करू शकतील, असे कोर्टाने म्हटले.
- यानंतर कोर्टाने दोन्ही पक्षकारांना ही कागदपत्र सादरीकरणासाठीची मुदत तुम्हीच ठरवा, असे सांगितले. दोन्ही वकिलांनी तीन आठवड्याची मुदत मागितली.
- पुढील सुनावणीची तारीख 29 नोव्हेंबर रोजी ठरवली जाईल, असे कोर्टाने म्हटले.
दोन महिन्यांनी सुनावणी?
29 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीची तारीख दिली असली तरीही ती पुढील दोन महिने लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. 15 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत कोर्टाला.नाताळच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे दोन महिने सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.