Latur | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, मागणीसाठी भाजपचे 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन
सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानाबाबत अद्याप मदत जाहीर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये 72 शेतकऱ्यांनी 72 तास अन्नत्याग आंदोलन सोमवारपासून सुरु केलंय. अशात एका शेतकऱ्याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. तर काही शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडण केलं आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र, राज्य सरकारकडून केवळ जुलै महिन्यातील अतिवृष्टीसाठी मदत जाहीर करण्यात आलीय. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानाबाबत अद्याप मदत जाहीर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये 72 शेतकऱ्यांनी 72 तास अन्नत्याग आंदोलन सोमवारपासून सुरु केलंय. अशात एका शेतकऱ्याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. तर काही शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडण केलं आहे.
‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांपैकी 2 शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला ॲडमिट केले आहे. लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र अद्याप या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही’, अशी टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरद्वारे केलीय.
दरम्यान, लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारपासून शेतकऱ्यांनी 72 तासाचं अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. भाजपचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार रमेश कराड हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.