लोकसभेनंतर विधानसभेला बारामतीत घरातच लढाई, काका vs पुतण्या रिंगणात; कोणाला कोण पडणार भारी?
गेल्या दोन दिवसांपूर्वीच युगेंद्र पवार म्हणाले होते, लोकसभेला ट्रेलर दाखवला आता विधानसभेला पिक्चर दिसेल असा इशारा देत अजित पवारांना आव्हान दिलंय. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेला देखील पवार विरूद्ध पवार अशी लढत निश्चित झाली आहे. बारामतीतून अजित पवारच लढणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच झाली. आता अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अखेर अजित पवार बारामतीतून अजित पवारच लढणार हे निश्चित झालं आहे. अजित पवार यांच्या ऐवजी त्यांचे पूत्र जय पवार हे लढू शकतील अशी चर्चा होती. मात्र बारामतीतून अजित पवारच लढणार असून शरद पवार यांच्या पक्षाकडून दादांचेच पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान असणार आहे. युगेंद्र पवार यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. तर त्यावेळी सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीच्या लढाईकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.