‘सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला पुन्हा…’, भाजपला रामराम करताना अजितदादांवर कोणाचा निशाणा?
सासू-सूनेचं भांडण झालं. त्यामुळे सून बाजूला झाली असं कोणाचेही नाव न घेता लक्ष्मण ढोबळे यांनी एक वक्तव्य केलं होतं. मात्र त्यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याचे पाहायला मिळतंय. यावर बोलताना लक्ष्मण ढोबळे म्हणाले, सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला पुन्हा सासू आली. तर तिथे थांबायचं कशाला असं वक्तव्य करत लक्ष्मण ढोबळे भाजपची साथ सोडत असताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
सोलापूरचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे विद्यमान नेते लक्ष्मण ढोबळे हे भाजपला रामराम करत आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी स्वतःच दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सातत्याने शरद पवार यांच्याशी भेटीगाठी घेतल्या यासंदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘भाजप सोडण्याच्या मनस्थिती येऊन रामाची साथ लक्ष्मणाने सोडली. लक्ष्मणाच्या कष्टाचं चीज झालं नाही असं वाटलं. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळात निष्ठेने शरद पवारांसोबत राहून त्यांची सेवा करणार आहे.’, असं लक्ष्मण ढोबळे यांनी म्हटले तर येत्या दोन दिवसात पक्षातील सगळ्यांना विश्वासात घेऊन मग मी सर्व राजीनामा देणार आहे. असेही त्यांनी म्हटले. माझ्या मतदारसंघात जो विद्यमान आमदार आहे, तो काँन्ट्रॅक्ट बेसवर वाढलेला आहे. त्याची कोणतीही अडचण होऊ नये त्यामुळे त्याला मोकळीक मिळावी म्हणजे आता ते तिथे एकटे राहतील, असा निशाणाही त्यांनी साधला.