‘अजित पवार यांनाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार?’ राष्ट्रवादी नेत्याचं सुटक वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजप नेते आमदार निलेश राणे यांच्यात सध्या वाकयुद्ध पहायला मिळत असतानाच आता पुण्यात देखील असं पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
इंदापूर : राज्याच्या राजकारणात आता भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत आहेत. सध्या मुख्य नेते हे मिळून राजकारण करताना दिसत आहेत. मात्र दुसऱ्यां नेत्यांचा वक्तव्यांमुळे खटके उडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजप नेते आमदार निलेश राणे यांच्यात सध्या वाकयुद्ध पहायला मिळत असतानाच आता पुण्यात देखील असं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. येथे राज्यासह जिल्ह्याची चावी आपल्याकडे असे म्हणत माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वक्तव्य केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबतही सुचक विधान करताना अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार असल्याचे भरणे यांनी सुचक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानांमुळे आता भाजपच्या गोटातून नाराजी समोर येण्याची शक्यता आहे. भरणे यांनी हे वक्तव्य राज्यातील सत्ता संघर्षानंतर इंदापूर येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केलं. यावेळी भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील आठ दिवसाचे काम दोन दिवसात करून घेण्यासाठी मी गेलो होतो. मी दुसऱ्यांसारखा मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावायला गेलो नव्हतो. यामध्ये इंदापूर तालुक्याला काय मिळेल यासाठी मी गेलो होतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. आता जिल्ह्याची व राज्याची चावी देखील आपल्याकडेच आहे. तर अजित पवारांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार? हे ही भरणेंनी सांगून टाकलं.