वाल्मिक कराडला भेटणाऱ्या माजी सरपंच तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी अन्…, नेमकं काय घडलंय?
वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप देखील धनंजय देशमुख यांनी केला आहे. धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित ही तक्रार केली आहे.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेने बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या भावालाच अरेरावी केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप देखील धनंजय देशमुख यांनी केला आहे. धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित ही तक्रार केली आहे. पोलीस कोठडीमध्ये असलेल्या कराडला कोणीही सहज भेटू शकतं असं धनंजय देशमुख यांनी म्हंटलंय. ‘बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो असता माजी सरपंच बालाजी तांदळे वाल्मिक कराडला भेटण्यासाठी आले. मला तांदळेनी विचारलं की तू पोलिस स्टेशनमध्ये काय करतो आणि सीआयडी वाले कुठे आहेत? वाल्मिक कराडला ठेवलेल्या कोठडीकडे तांदळे गेले. परतल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही 6 डिसेंबरला पवन चक्की वादाच्या ठिकाणी होते ना? त्यानंतर बालाजी तांदळे यांनी मीच आरोपींना पकडल्याचं सांगून माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुलेचा फोटो दाखवला आणि अरेरावी केली. पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी रेडेकर यांना संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर आपण सीआयडीचा वाहन चालक असल्याचे सांगितले. बालाजी तांदळे महिला पोलीस कर्मचारी रेडेकर यांच्याशी हुज्जत घालत असतानाच उलट एपीआय दराडे यांनी रेडेकर यांना आवाज कमी करा असं म्हंटलं आणि बालाजी तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडूनही दिलं. माझी तक्रार आहे की आरोपीच्या ठिकाणी असे लोक कसे येतात?’, असं धनंजय देशमुख म्हणाले.