‘संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना आता कुठे जायला तोंड…’, उमेदवारी जाहीर होताच शरद पवारांच्या नेत्याचा घणाघात
यंदाची विधानसभा निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे. करमाळा तालुक्यातील प्रलंबित पाण्याच्या योजना मार्गी लावणार आहे. रिटेवाडी उपसा सिंचन योजना शरद पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचे ही माजी आमदार नारायण पाटील यांनी म्हटले. दरम्यान, नारायण पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, अमोल कोल्हे आदि नेत्यांच्या सभा होणार आहेत.
माजी आमदार नारायण पाटील यांना शरद पवार गट राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार नारायण पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नारायण पाटील यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजयसिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले. यावेळी सोलापूर करमाळा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसून आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना नारायण पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. संजयमामा शिंदे अपक्ष निवडणूक यासाठी लढवितात त्यांचा राजकीय प्रवास बघितला, जीवनपट बघितला तर त्यांनी आयुष्यभर सर्वांना फसविण्याचे काम केले आहे. प्रत्येकाची मदत घ्यायची त्यांना सोडून दुसरा धरायचा अशा पध्दतीने ते जिल्हयातील सर्व नेत्यांबरोबर चुकीचे वागले असल्याचे हल्लाबोल नारायण पाटील यांनी केला. संजयमामा शिंदे हे महाराष्ट्राच्या नेत्यांबरोबर चुकीचे वागले आता त्यांना कुठे जायला तोंड राहिले नाही, त्यामुळे ते अपक्ष उभे राहत आहे, असा घणाघातही त्यांनी केला.