Manoj Jarange Patil : माजी राज्यमंत्री म्हणतात, जरांगे पाटील आता ‘अमिताभ बच्चन’ इतकेच फेमस…
गेल्या १७ दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांची राज्यात सर्वत्र चर्चा होत आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसून राज्य सरकारला त्यांनी जेरीस आणले. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपोषणस्थळी येण्यास भाग पडले. त्यामुळेच....
जालना : 14 सप्टेंबर 2023 | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सतरा दिवसापासून उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत घेत त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. जरांगे पाटील यांचे हे उपोषण सोडवण्यासाठी शिंदे गटाचे दोन प्रमुख शिलेदार सातत्याने प्रयत्न करत होते. एक म्हणजे मंत्री संदिपान भुमरे आणि दुसरे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर. याच्यासोबतच माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत हे ही सातत्याने उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. मंत्री संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री आंदोलनस्थळी कालच येणार होते पण ते आज आले. मनोज जरांगे यांच्या तिन्ही मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या आहेत. अर्जुन खोतकर हे यामधील महत्वाचा दुवा होते असे सांगितले. तर, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी ज्या दिवशी आंदोलनाला सुरवात झाली तेव्हापासून राबत आहे. झोप नाही, जरांगे पाटील यांची खूप काळजी घेतली. गावातलं, जिल्ह्यातलं, राज्यातलं वातावरण खराब न होणे याची काळजी घ्यावी लागत होती. मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये आम्ही मधला दुवा म्हणून काम करत होतो. आमच्या प्रयत्नांना यश मिळाले. बिनदिक्कत उपोषण सुटले. पण खरा आनंद जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हाच होईल असे ते म्हणाले. त्याचबरोबर मनोज जरंगे हे आता समाजासाठी अमिताभ बच्चन इतकेच फेमस आहेत अशी मिश्कीलीही त्यांनी केली.