Special Report | बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा हंगामा!

Special Report | बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा हंगामा!

| Updated on: Jun 18, 2021 | 9:08 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार आज बीडमध्ये घडला

बीड : कोरोना आणि खरीपाची पेरणी याबाबत आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार आणि राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला पालकमंत्री धनंजय मुंडे, सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा बाहेर पडत असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफा अडवला. सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी शेकडो कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळा झाले होते. त्यात महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. (Frontline workers lathicharged in Beed as they try to stop Ajit Pawar convoy)

बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अजित पवारांना भेटू देण्याची मागणी केली. मात्र, त्यांची भेट दिली गेली नाही. बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि राजेश टोपे यांचा ताफा निघाला असता तो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अडवला. तेव्हाही या कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाड्या पुढे निघाल्या. त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

लाठीमाराच्या प्रकारानंतर पंकजा मुंडेंची टीका

या संपूर्ण प्रकारावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार टीका केलीय. अजित पवार यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी बीडमधील पोलिसांच्या लाठीमाराच्या प्रकारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय.

लाठीमाराच्या प्रकारावर पंकजा मुंडे यांनी तीव्र शब्दात नाराज व्यक्त केलीय. ‘हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले. स्वत:च्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले आहेत तर जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजित पवारांची भेट घडवून आणणं तिथल्या स्थानिक नेत्यांचं काम होतं. त्यांनी ठरवलं असतं तर गोंधळ झाला नसता. मागण्या तर पूर्ण होत नाहीत, पण किमान भेट आणि बोलू द्यायला हवं होतं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे. अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

संबंधित बातम्या

Video : अजित पवारांच्या बैठकीदरम्यान मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, तरुण पोलिसांच्या ताब्यात

देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक; आंदोलनाची रणनीती ठरणार?

(Frontline workers lathicharged in Beed as they try to stop Ajit Pawar convoy)

Published on: Jun 18, 2021 09:08 PM