गांधीजींचा मृत्यू गोडसेच्या गोळीमुळे नाही, रणजीत सावरकरांच्या पुस्तकात दावा
महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांच्या गोळीने झाली नसल्याचा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनी केला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'मेक शुअर गांधी इज डेड' या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. यामुळे खळबळ माजली आहे.
मुंबई | 29 जानेवारी 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांच्या एका पुस्तकाने खळबळ उडाली आहे. रणजीत सावरकर यांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकावरून चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. गांधीजी यांची हत्या नथुराम गोडसे याच्या गोळीने झालेली नाही, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रणजीत सावकर यांनी म्हटले आहे की नथुराम गोडसे यांनी गांधीजी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या हे शंभर टक्के सत्य आहे. हे सत्य आपण अजिबात नाकारत नाही. मात्र फोरेन्सिक तपासानुसार त्या गोळ्या नथुराम याच्या पिस्तुलातील नव्हत्या. नऊ एमएमच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांच्या जखमा खूप मोठ्या असतात. गांधीच्या शरीरावर झालेल्या जखमा या नऊ एमएमच्या पिस्तुलातील नव्हत्या. शिवाय ज्या अँगलने गोळ्या झाडल्या तो अँगल विविध दिशेचा होता. त्यामुळे दोन किंवा अधिक लोकांनी छोट्या कॅलिबरच्या पिस्तुलातून या गोळ्या झाडल्याचे अहवालातून स्पष्ट होते. त्यामुळे नथुराम गोडसेच्या गोळींनी गांधी मेले नाहीत असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.