मुंबई : ‘लालबागचा राजा’ हा कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या 10 दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. लालबागच्या राजाकडे सर्व मनोकामना पूर्ण होतात, मनातील इच्छापूर्ती होते. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकण्यासाठी भाविक विश्वासाने येतात. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. पण पहिल्याचदिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. कालपासूनच हजारो भाविक नवसाच्या रांगेत उभे आहेत. लालबागच्या राजाच्या मंडपात मोठी गजबज आहे. सर्वत्र शिट्ट्यांचे आवाज ऐकू येत आहेत. पोलिसांनी इथे कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. आज सकाळपासूनच लालबाग नगरीत उत्साहाच वातावरण आहे. करीरोड, लोअर परेल येथून भक्तगण मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत. आज सकाळपासूनच या भागात मोठी लगबग दिसून येत आहे. परेल-लालबागमध्ये अनेक मोठी गणेश मंडळ आहेत.