बाप्पाच्या विसर्जनानंतर गणेश मुर्तीचे फोटो काढणं यंदा पडू शकतं महागात, कारण…
येत्या 7 सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार असून त्यानंतर दीड दिवसापासून पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातच पोलिसांकडून काही महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 08, 11, 12, 13 आणि 17 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे. त्यापूर्वी पोलिसांचे आदेश काय?
लाडक्या गणपती बाप्पांचे स्वागत अवघ्या काही दिवसांवर आले आहे. बुद्धीची देवता असणाऱ्या या गणरायाचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात तसेच घरोघरी आगमन होणार आहेत. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिकांची एकच लगबग सुरू आहे. अशातच पोलिसांनी काही महत्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये, यासाठी पोलिसांकडून काही महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून का, असे आदेशच पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे यंदा बाप्पाच्या विसर्जनानंतर गणेश मुर्तीचे फोटो काढणं तुम्हाला महागात पडू शकतं. गणपती विसर्जनानंतर गणेश मूर्तीचे फोटो न काढण्याचे आदेश पोलिसांकडून नागरिक आणि गणेश भक्तांना देण्यात आले आहेत. इतकंच नाहीतर बाप्पाच्या विसर्जनानंतर मूर्तीचे फोटो काढल्यास किंवा ते सोशल मीडियावर प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे महत्त्वाचे आदेश नागरिकांना दिले आहेत.