पोलिसांकडून गणपती बाप्पालाच अटक? कर्नाटकात नेमकं काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
भाजप नेत्यांच्या आरोपांनुसार कर्नाटकात गणपतीला तुरुंगात टाकण्यात आलं आहे. काँग्रेसवर तुष्टीकरणाचाही आरोप भाजपनं केला. महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनीही कर्नाटकातल्या घटनेवरुन महाविकासआघाडी नेत्यांना सवाल केले आहेत. दावे-प्रतिदाव्यांआधी कर्नाटकात नेमकं घडलं काय?
कर्नाटकात एका आंदोलनाच्या निमित्तानं गणपतीला अटक झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही तापलं आहे. आंदोलनाच्या निमित्तानं कर्नाटकात झालेल्या वादात काँग्रेस सरकारच्या कारभारावर भाजपनं निशाणा साधला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या मांड्या शहरात विसर्जनावेळी दोन गटात वाद झाला होता. त्या घटनेचा निषेध म्हणून बंगळुरात विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन पुकारण्याची घोषणा केली. परवानगी नसताना बंगळूरच्या टाऊन हॉल परिसरात लोक जमू लागल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवला गेला. त्यानंतर काही कार्यकर्ते आंदोलनातच गणपतीची मूर्ती डोक्यावर धरुन घोषणा देत आंदोलनस्थळी पोहोचले पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलकांनी मूर्तीला घेवून रस्त्यावरच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आधी मूर्तीला आंदोलकांकडून घेत पोलीस व्हॅनमध्ये ठेवलं. नंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. थोड्यावेळानं तिथं दुसरी पोलीस कार आल्यानंतर व्हॅनमधली मूर्ती कारमध्ये ठेवण्यात आली. मात्र तोपर्यंत पोलीस व्हॅनमध्ये ठेवलेल्या गणेशमूर्तीचे फोटो पत्रकारांनी टिपले आणि ते फोटो व्हायरल झालेत.