बकरीने पाला खाल्ला म्हणून बकरीच्या मालकाला दंड, पोलिसांनी बकरीलाच घेतलं ताब्यात अन्…
VIDEO | बकरीनं झाडांचा पाला खाल्ल्यानं मालकाला दंड, तर पोलिसांनी चक्क बकरीला ताब्यात घेऊन दिवसभर ठेवलं बांधून
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुत्र्याने बूट चोरल्याचा विषय थांबत नाही तोपर्यंतच बकरीने पाला खाल्याचा विषय समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या आवारात धक्कादायक प्रकार घडला. पिशोर पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडांचा पाला खाल्ल्यामुळे पोलिसांनी चक्क बकरीला ताब्यात घेऊन दिवसभर बांधून ठेवले. इतकंच नाही तर सायंकाळी बकरीच्या मालकावर थेट गुन्हा दाखल करत 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 3 हजाराची बकरी आणि दोन हजाराचा दंड भरण्याची वेळ बकरी मालकावर आली आहे. बकरी मालक राउफ रज्जाक सय्यद यांच्यावर कलम 90 (अ) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पिशोर हद्दीत अनेक बेकायदेशीर धंदे सुरू असताना बकरीने पाला खाल्ल्यामुळे गुन्हा दाखल केल्यानंतर पिशोर पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. बकरी मालकानेही पिशोर पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला आहे. पिशोर पोलिसांच्या या अजब गजब कारवाईची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे.