बदलापुरातील प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय, आता शिपायापासून मुख्याध्यापकाची…
बदलापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागं झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुलींच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्यात
बदलापुरातील अल्पवयीन अत्याचार प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंबईतील शैक्षणिक संस्थासाठी मुंबईचे मंत्री मंगलप्रभात लोढांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, आता यापुढे शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत सर्वांना पोलीस पडताळणी बंधनकारक असणार आहे. मुंबईतील शैक्षणिक संस्थांसाठी सरकारने दिलेल्या आदेशामध्ये, मुलींच्या स्वच्छतागृहात एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमणं बंधनकारक असणार आहे. शैक्षणिक संस्थेत सीसीटीव्ही लावणं बंधनकारक असणार आहे. यासोबत पोलिसांना वेळोवेळी आढावा घेण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले आहे. मुलींच्या आत्मसंरक्षणासाठी शाळांमध्ये अभियान सुरू करण्याचे आदेश, महिला पालकांची समिती नेमून प्रत्येक महिन्याला सुरक्षा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना असे आदेश दिले आहेत.