बच्चू कडूंसोबत आता गुलाबराव पाटीलही, फडणवीसांना म्हणाले, 40 वर्षांचं करिअर डावाला…
गुलाबराव पाटील म्हणाले, ' रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही तर ही गोष्ट चुकीची होईल. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल.
स्वप्निल उमप, अमरावतीः रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेले खोके घेतल्याचे आरोप सिद्ध करून दाखवाच, असं आव्हान बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाही आव्हान दिलंय.
आम्ही सरकारला पाठिंबा देण्यासाठी पैसे घेतले असतील असा भाजपचा, रवी राणांचा आरोप असेल तर त्यांनी ते कोर्टात सिद्ध करून दाखवावं, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. आता जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनीदेखील बच्चू कडू यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप केलेत. मात्र बच्चू कडू यांनी हा आरोप फक्त माझ्यावरच नाही तर भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदेंसह इतर 40 आमदारांवरही आहे. त्यामुळे सर्वांनीच पैसे घेतले असतील तर ते सिद्ध करा, अशी भूमिका मांडली आहे.
एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारावर आरोप करण्यासारखं आहे, कोणी विकावू नाहीये, एका तुमच्या वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही, म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडे बोल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावले असून दुसरीकडे बच्चु कडू यांची बाजू घेतली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही तर ही गोष्ट चुकीची होईल. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. 40 वर्षाचं करियर डावाला लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघांनाही शांततेने बसवावं, हीच प्रार्थना आहे, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
सरकारने ठाकरे गटासह विरोधक पक्षाच्या नेत्यांच्या सुरक्षा काढल्याने सरकारवर टीका होत आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा मत व्यक्त केलं आहे.
सुरक्षा काढण्यावरून कुणी राजकारण करत नसतो, एखाद्या नेत्याची सुरक्षा काढल्याने कुणाला काही आनंद होत नसतो, सुरक्षे संदर्भात एक कमिटी काम करते, त्यानुसार तो निर्णय होतो, या समितीच्या आलेल्या आढावानुसारच हीच सुरक्षा करण्यात आले असून कोणत्याही नेत्याची सुरक्षा काढण्यामध्ये सरकारला स्वारस्य नाही, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.