द्राक्ष पिकांना अवकाळी पावसाचा फटका, तरीही होतेय अधिक निर्यात
VIDEO | गारपीट आणि अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकांना फटका, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती झाली निर्यात, बघा दिलासादायक बातमी
नाशिक : राज्यातील अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांच्या बागांना फटका बसला आहे. त्यामुळे यंदा द्राक्ष निर्यात कमी होणार का अशी धास्ती द्राक्ष उत्पादकांमध्ये होती. मात्र अवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पंधरा ते वीस हजार मेट्रीक टनने अधिक द्राक्षाची निर्यात झाली आहे. जवळपास एक लाख पंधरा हजार मेट्रीक टन निर्यात झाली असून हंगाम शिल्लक असल्याने यात अजून वाढ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघटनेने दिली. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. मात्र व्यापाऱ्यांना याठिकाणी द्राक्ष कमी प्रमाणात मिळाले असले तरी देखील त्यांनी लातूर, कोल्हापूर यासह अनेक जिल्ह्यातून व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी करून त्याची निर्यात केली असल्याने यावेळी मागील वर्षाच्या तुलनेत पंधरा ते वीस हजार मेट्रीक टन जास्त निर्यात झाले असल्याची माहिती समोर आली आहे.