‘आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून…’, हर्षवर्धन पाटलांचा अजित दादांना खोचक टोला
हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये शरद पवार गट राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका करताना हर्षवर्धन पाटील यांनी भाजपवरही निशाणा साधला होता. त्यावरून अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले होत. दरम्यान, हर्षवर्धन पाटलांना यावर पलटवार करताना दादांवर उपरोधिक टीका केली आहे.
‘मी पहाटे उठून कुठे जात नाही, आमचा कारभार जनतेतून चालतो’, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत, अजित पवार यांना कोणत्याही सभेत काहीही बोलण्याची त्यांना परवानगी आहे, असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवारांकडे जाताना बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी अदृश्य प्रचार केल्याचं विधान हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. त्यावरून अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांनाच लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले होते. ‘हर्षवर्धन पाटील म्हणाले… लोकसभेला मी पूर्वी प्रत्यक्ष काम करायचो. यावेळी मी अदृश्य काम केलं. अरे, अजित पवारनी आजपर्यंत कधी आयुष्यात असं काम केलं नाही. जो कुणी उभा राहील, त्याचं इमानदारीनं काम केलं’, असं अजित पवार म्हणाले. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं, जेवायला घातलं. ओवाळलं. आता म्हणतायत आम्ही अदृश्य प्रचार केला. याला आता तर … टांग्याचा घोडा कसा असतो, तसं…ही लोकं कुणाची नाही.. असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तर यावरच हर्षवर्धन पाटलांनी पलटवार केला. आमचा कारभार जनतेतून चालतो. मी पहाटे उठून कुठे जात नाही, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.