समुद्रात बोंबिलही जाळ्यात सापडेना? खव्वयांसह मच्छिमारांची चिंता वाढली; काय होतय मुंबईत?
वाढत्या उष्म्याचा तडाखा अन्य सजीवांप्रमाणेच समुद्रातील माशांनाही बसत असल्याचे दिसत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मासेमारीवर झाला असून पावसाळ्यातील बंदीचा कालावधी लागू होण्यापूर्वीच मासेमारी 50 टक्क्यांनी घटली आहे.
मुंबई : राज्यात वाढणाऱ्या उष्णतेच्या पाऱ्याचा जनमाणसावर परिणाम होताना दिसत आहे. असाच परिणाम आता प्राण्यावर देखिल होत आहे. त्यामुळे नागरिक हे पाण्यासह थंड पेयांचा तर प्राणी हे पाणी असणाऱ्या ठिकाणी पडून राहत आहेत. मात्र जर वाढत्या गर्मीचा थेट माश्यांवरच परिणाम झाला तर… असाच काहीसा प्रकार हा मुंबईच्या समुद्रात झाला आहे. वाढत्या उष्म्याचा तडाखा अन्य सजीवांप्रमाणेच समुद्रातील माशांनाही बसत असल्याचे दिसत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मासेमारीवर झाला असून पावसाळ्यातील बंदीचा कालावधी लागू होण्यापूर्वीच मासेमारी 50 टक्क्यांनी घटली आहे. प्रत्येक वर्षी या दिवसांमध्ये सुरमई, रावस, करंदी, तारल्यांची रेलचेल असते. यंदा मात्र हे मासे नावाला उरले आहेत. तर छोट्या आकाराची पापलेट सोडलेतर बोंबिलही जाळ्यात सापडत नाहीत. त्यामुळे ताज्या माशांसह पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी जे मासे लागतात त्यांची उपलब्धता कुठून करायची असा प्रश्न आता कोळी समाजापुढे उभा ठाकला आहे. त्यातच आता जून ही जवळ येत आहे. 1 जूनपासून मासेमारी बंद होईल. यंदा एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने कोरडे गेल्यामुळे तर मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा दरावर होतो. त्यामुळे खव्वयाचिही चिंता वाढताना दिसत आहे.