‘सातच्या आत घरातचा आग्रह फक्त मुलींसाठीच? मुलींवर निर्बंध लादण्याऐवजी मुलांना…’, थेट सवाल करत हायकोर्टाची उद्विग्नता
मुलींवर निर्बंध लादण्याऐवजी मुलांना चांगल्या वर्तनाची शिकवण देणे गरजेचे आहे, असे कोर्टानं मत व्यक्त केलं. मुलांनाही महिलांचा, मुलींचा आदर करायला शिकवा. काय करू नये हे मुलांना शिकवण्याची गरज आहे, असे कोर्टानं स्पष्ट केलं. तर केवळ मुलींनाच का? मुलांना सातच्या आत घरात यायला का सांगत नाही ? असा सवाल करत कोर्टाने उद्विग्नता व्यक्त केली.
‘सातच्या आत घरात’ चा आग्रह फक्त मुलींसाठीच का करता? असा सवाल करत ‘सातच्या आत घरात’ यायला मुलांना का सांगत नाही? असा सवाल हायकोर्टाने केला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने असा सवाल केला आहे. मुलांना महिलांचा आदक करायलाही शिकवा, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. तर ‘काय बरोबर, काय अयोग्य हे मुलांना का शिकवत नाही? मुलांनी काय करू नये, हे तुम्हाला सांगावे लागेल. समानता शिकवली नाही तर कितीही कायदे असले तरी ते मदतीला येणार नाहीत.’, असे मतही हायकोर्टानं नोंदविलं आहे. बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात 27 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखण्यात याव्यात, याची शिफारस करण्याकरता समिती नियुक्त करण्यासाठी काही नावे सुचविण्याची सूचना न्या. रेवती मोहिते – डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना केली. यावेळी कोर्टाने काही थेट सवाल उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले.