जेलमध्ये जाईन पण जामीन घेणार नाही, भाजप खासदारांचे मोठे विधान
माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय. नांदेड, हिंगोली, परभणी येथील रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. लोकप्रतिनिधी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. त्यावेळी तेथील शौचालय वाईट अवस्थेत होते. घाणीने भरलेलं होते.
हिंगोली : 4 ऑक्टोबर 2023 | हिंगोलीचे भाजप खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावले होते. हे प्रकरण हेमंत पाटील यांच्या अंगलट आलेय. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय. नांदेड, हिंगोली, परभणी येथील रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. लोकप्रतिनिधी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. त्यावेळी तेथील शौचालय वाईट अवस्थेत होते. घाणीने भरलेलं होते. ही अनास्था का अशी विचारणा अधिष्ठाता यांना केली. ते विचारल तर काही चूक आहे का? मी स्वतः पाणी टाकून शौचालय साफ केले. ज्या रुग्णालयात ३६ बालक मेली हे चांगले आहे का? जी बालके मेली त्यांना जात, धर्म होता का? आता कुणी त्यावर आंदोलन करत असेल काही करत असेल, माफी मागावी अशी मागणी करत असेल तरी मी काही माफी मागणार नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तरी मी जमानत घेणार नाही. प्रसंगी जेलमध्ये जायला तयार आहे. लोक रुग्णालयात मरतात त्याचा जाब पण विचारायचा नाही का ? असा सवाल हेमंत पाटील यांनी केला.