महायुतीतील सहभागासाठी ‘मनसे’कडून ‘या’ तीन जागांचा प्रस्ताव, कोणत्या जागेवर कोण लढणार?
आज उद्या मनसे महायुतीत सहभागी होण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीन जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय
मुंबई, २१ मार्च २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री, भाजपचे बडे नेते अमित शाहना भेटून आले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कालरात्री गुप्त बैठक झाली. दरम्यान, आज उद्या मनसे महायुतीत सहभागी होण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीन जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीत राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आज झालेल्या वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलमधील बैठकीतही मनसेचा ३ जागांसाठी आग्रह आहे. दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक अशा तीन जागांसाठी मनसे आग्रही असल्याचे कळतेय. दरम्यान, दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे, शिर्डीतून बाळा नांदगावकर आणि नाशिकमधून शांतिगिरी महाराज यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.