कांदा, कापूस, टोमॅटोनंतर आता दुधाने आणलं शेतकऱ्यांना संकंटात? शेतकऱ्यांनी केला चक्काजाम
यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असतानाच आता दुधाने देखील शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणायचं ठरवलं आहे. गेल्या महिन्यात प्रतिलिटर 37 रुपये असलेले दुध या महिन्यात थेट 33 रूपयांवर आलं आहे. त्यामुळे प्रतिलिटर दुधात 4 रूपयांची घसरण झाली आहे.
औरंगाबाद : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात कांदा, कापूस, टोमॅटो, मिरची सह इतर पिकांचा आणि फळबागांचा समावेश आहे. यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असतानाच आता दुधाने देखील शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणायचं ठरवलं आहे. गेल्या महिन्यात प्रतिलिटर 37 रुपये असलेले दुध या महिन्यात थेट 33 रूपयांवर आलं आहे. त्यामुळे प्रतिलिटर दुधात 4 रूपयांची घसरण झाली आहे. या घरणीचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांवर झाला आहे. तर आगामी काळात हे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच शेतीमालाला भाव नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी दुधाचे दर कमी झाल्याने आणखी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. याचदरम्यान दुधाचे भाव घसरल्यामुळे औरंगाबादमध्ये शेतकरी आक्रमक झाला आहे. येथे करंजगाव या गावात रस्ता रोको करण्यात आला असून सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर रस्त्यावर दूध ओतून दुधाने अंघोळ करत आंदोलन केले जात आहे.