शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना १ कोटींची मदत मिळावी, ठाकरे गटाच्या या आमदाराची सभागृहात मागणी
राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यूवरून राज्यातील पेटलेलं राजकारण अद्याप सुरूच, सभागृहातही मुद्दा गाजला
मुंबई : राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यूवरून राज्यातील पेटलेलं राजकारण अद्याप सुरूच आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येचं प्रकरण विधानसभेतही गाजल्याचं पाहायला मिळालं. पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्येची निःपक्षपणे चौकशी करावी, पोलिसांना तपासात फ्री हॅण्ड देण्यात यावा, तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घ्यावी, राज्यात पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला असून पत्रकार वारिसे यांच्या हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधण्याची मागणी यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. तर राजन साळवी यांनी देखील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्येबाबत बोलताना असे म्हटले की, वारिसे यांची आई वयोवृद्ध आहे, मुलगा तरूण आहे. त्यामुळे शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री यांच्या सहाय्याने मदत निधी जाहीर झाला आहे. पण त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रूपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणीही राजन साळवी यांनी केली.