नागपुरातील पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने स्वीकारावी; काँग्रेस नेत्याचा चिमटा
पदवीधर, शिक्षकांचा सरकार प्रति असणारा रोष मतपेटीतून व्यक्त, काकासाहेब कुलकर्णी यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
सोलापूर : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआला घवघवीत यश मिळाल्याचे पाहायला मिळत असून अशातच काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांनी सरकार प्रति असणारा रोष मतपेटीतून व्यक्त केला आहे. त्यामुळे पाच पैकी तीन जागा मविआने जिंकल्या आहेत. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाची उलटी गिनती सुरू झाली असल्याचे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. नागपूरसारख्या ठिकाणी संघाचे मुख्यालयासह भाजपचे दिग्गज नेते आहेत अशा ठिकाणी भाजपचा पराभव होतो आणि यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणता जर आम्ही निवडणूक लढवली असती तर आमचा विजय झाला असता. ज्याप्रमाणे एखादा ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यावर देवेंद्र फडणवीस विजयाचे श्रेय घेतात त्याप्रमाणेच पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. नागपुरातील पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने स्वीकारावी आणि महाविकास आघाडीचं कौतुक करावे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.