कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? डी.के शिवकुमार आणि सिद्धरामय्यांमध्ये CM पदासाठी रस्सीखेच
VIDEO | कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? मुख्यमंत्री पदासाठी डी.के शिवकुमार आणि सिद्धरामय्यांमध्ये यांच्यात चढाओढ सुरु
बंगळुरू : कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत अजूनही सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी बेंगळुरूमध्ये पद मिळण्याआधीच जोरदार घोषणाबाजी केली आहे. रविवारी रात्री अडीच तास काँग्रेसची बैठक सुरू होती. दरम्यान, कर्नाटकाचा नवा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय हायकंमाड ठरवणार असल्याचे सांगितले जात आहे. बंगळुरू येथे रात्री 8 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठकही पार पडली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाचीही घोषणा होऊ शकते अशी शक्यताही वर्तवली जात असताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाने रविवारी एक संक्षिप्त ठराव पास केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकातील विधिमंडळ पक्षाचे पुढचे नेते ठरवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न अद्याप कायम असून डी.के शिवकुमार आणि सिद्धरामय्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल या बैठकीतून कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या चेहरा समोर येईल. कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर अनेक पोस्टर्स लावून जल्लोष केला होता. तर या पोस्टर्समध्ये सिद्धरामय्या हेच कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.