Raigad | हिम्मत असेल तर कोल्हापुरात अडवून दाखव, Kirit Somaiya यांचे चॅलेंज
सामनामधून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर 'हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा' असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय. जर किरीट सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामधून किरीट सोमय्याची दखल का घेता? असा सवालही त्यांनी केला आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले घोटाळे कोल्हापूरमध्ये जाऊन उघडकीस आणणार असल्याची घोषणा करत किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौऱ्याचा निर्धार केला आहे. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा सोमय्यांनी चंगच बांधलाय. पण पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आणि सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबावं लागलं. पण यादरम्यान कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता मंगळवार आणि बुधवारी पुन्हा एकदा सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील.