तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांचा निर्धार कायम
VIDEO | 'आमच्या मागण्यांवर अंमलबजावणी झाल्याशिवाय आमचा लाँग मार्च पुढे चालत राहणार', लाखो शेतकऱ्यांसह जे पी गावित यांचा निश्चय कायम
मुंबई : किसान सभेच्या शिष्ठमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगितले जात आहे. आमच्या मागण्यांसंदर्भात जीआर बनवून कलेक्टरकडे पाठवा आणि त्याच्या अंमलबजावणी सुरुवात झाली की आमचं आंदोलन आम्ही मागे घेऊ. आम्ही फक्त आज थांबतोय. पण जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, शेतकरी संघटनेचे प्रणेते जे पी गावित यांनी म्हटले आहे. आमच्या मागण्यांवर बरीच चर्चा झाली. आमच्या मागण्यांवर चर्चा होऊन निर्णय झाले आहेत. मागच्या दोन मोर्चांचा अनुभव घेता जे आश्वासन दिलं जातं ते पाळलं जात नाही किंवा प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नाही. आमच्या मागण्या या विचाराधीन आहेत. पण आमच्या मागण्यांवर अंमलबजावणी झाल्याशिवाय आमचा लाँग मार्च पुढे चालत राहणार, असा निश्चय घेऊन आम्ही आलो आहोत, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे प्रणेते जे पी गावित यांनी दिली आहे.