विदर्भातील कुणबी मराठा नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू, जीर्ण कागदपत्रांची तपासणी
जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली डेडलाईन पाळता यावी म्हणून विदर्भातील कुणबी मराठा नोंदी शोधणं युद्धपातळीवर सुरु, चार दिवसात तपासणी पूर्ण करण्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांचे आदेश. महसूल, पोलीस, मध्यवर्ती कारागृह, सहकारी संस्था, नगरपालिका, या विभागात शोधमोहिम सुरू
नागपूर, ८ नोव्हेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली डेडलाईन पाळता यावी म्हणून नागपूरसह विदर्भातील कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी नोंदी शोधणं युद्धपातळीवर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. चार दिवसात ही तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदीचा शोध घेणं सुरू आहे. ही तपासणी करताना १९४८ पूर्वीचे कागदपत्र आणि १९४८ ते १९६७ पर्यंतचे कागदपत्र शोधण्याची मोहिम सुरू आहे. तपासणी सुरू असलेल्या रेकॅार्डरुममधील बरेच कागदपत्र जीर्ण झाली आहेत. त्यामुळे नोंदी शोधताना अडचणी येत आहे. तपासणी करणारे कर्मचारी दुर्बीनद्वारे मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी मराठ्यांच्या नोंदी शोधत आहेत. महसूल, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, मध्यवर्ती कारागृह, सहकारी संस्था, नगरपालिका, मनपा, भुमिअभिलेख या विभागात शोधमोहिम सुरू आहे.