Ladki Bahin Yojana : खऱ्या अर्थानं ‘लाडक्या’ बहिणीची वेडी माया… मंगळसूत्राची केली राखी अन् मुख्यमंत्र्यांना दिली
राज्यभरातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात महिलांच्या खात्यांत ३००० रूपये आल्याने महिलांना एकच जल्लोष केला आहे. तर काही ठिकाणी पैसे काढण्यासाठी बँकांसमोर एकच झुंबड उडाली आहे. अशातच सांगलीमध्ये एका लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मंगळसूत्रातील सोन्याचं पदक काढून त्यांची राखी भेट दिली आहे.
महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीतल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांना थेट आपल्या मंगळसूत्राची राखी बनवून भेट केली आहे. स्टेला दास सकटे या महिलेने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून दिली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात हे अर्धे तोळे सोन्याच्या दागिन्याची राखी सुपूर्द केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत आणि ही योजना अशाच पद्धतीने सुरू राहावी,अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही अनोखी भेट दिल्याचं स्टेला सकटे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजून कोणतीच मोठी अपेक्षा नाही. पण त्यांनी ही योजना आणि इतर योजना सुरु ठेवाव्यात अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे.