Ladki bahin Yojana Video : ‘लाडकी बहीण’वर अजितदादांचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, महिलांचे पैसे परत…
लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात असताना ही योजना बंद होणार असल्याचा आरोपही केला जात आहे. या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान भवनातील सभागृहात आज केलं. यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण ही योजना बंद करणार नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले. तर कोणत्याही लाडकी बहीण लाभार्थी महिलेचे पैसे परत घेणार नसल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले, ‘लाभार्थी महिलेला दिलेले पैसे परत घेण्यात येणार नाही. आम्ही कोणत्याही महिलेचे पैसे परत घेणार नसून ही योजना सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी जो निधी लागेल तो निधी दिला जाईल’, असं अजित पवार यांनी सभागृहात लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना स्पष्ट केलं. पुढे ते असेही म्हणाले, ‘लाडकी बहीण योजना गरिब महिलांसाठी आहे. कधी-कधी योजना जाहीर केल्यानंतर काही गोष्टी समोर आल्यानंतर त्या योजनेत बदल केले जातात. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील काही गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यात दुरूस्ती करण्यात येणार आहे. मात्र ही योजना बंद करण्यात येणार नाही. गरिब महिलांवर कोणताही अन्याय होणार नाही. ज्यांना १०० टक्के गरज आहे. त्यांना सरकार योजनेचे पैसे देणारच’, असं म्हणत गरिब लाडक्या बहिणींना अजित पवारांनी आश्वस्त केलं.