अमरावतीत बच्चू कडू-राणा यांच्यात सामाना रंगला असतानाच तिसऱ्या कोणाची उडी? थेट दावाच सांगितला
या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या जागेवर दावा केला आहे. तर काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा असल्याने या जागेवरून काँग्रेसचाच उमेदवार लढणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.
अमरावती : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या जागेवर दावा केला आहे. तर काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा असल्याने या जागेवरून काँग्रेसचाच उमेदवार लढणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. याचदरम्यान अमरावतीत देखील लोकसभा जागेवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा आणि पती रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. आता यात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकुर यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असल्याचे सांगत अमरावती मध्ये काँग्रेसला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. इतकेच काय तर अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे हा आमचा अट्टाहास असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच प्रभुत्व आहे. त्यामुळे अमरावती मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.