तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'ठाकरेंच्या लक्षात आलं, मुंबईत आपला मराठी मतांचा टक्का कमी झालाय, याची भरपाई कुठून करता येईल, त्यावेळी मुस्लिम मतांवर त्यांचं लक्ष गेलं. मुस्लिमांच लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या. त्यांच्या पायावर लोळण घातली की, भरपाई करता येईल असं उद्धव ठाकरेंना वाटतंय', फडणवीसांचा घणाघात
मुस्लिम मत उद्धव ठाकरेंकडे जातायत. मराठी प्लस मुस्लिम मतांच्या बेरजेमुळे भाजपा नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडलेत का? यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरेंच्या लक्षात आलं, मुंबईत आपला मराठी मतांचा टक्का कमी झालाय, याची भरपाई कुठून करता येईल, त्यावेळी मुस्लिम मतांवर त्यांचं लक्ष गेलं. मुस्लिमांच लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या. त्यांच्या पायावर लोळण घातली की, भरपाई करता येईल असं उद्धव ठाकरेंना वाटतंय असं फडणवीस म्हणाले. इतकंच नाहीतर ठाकरेंनी जाणीवपूर्वक टिपू सुल्तान जयंती साजरी करणं सुरु केलं. त्यांच्या रॅलीत अल्लाहू अकबरचे नारे दिले, हे चुकीचच होतं. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हे खपवून घेतल नसतं. आता त्यांचं लांगुलचालन या स्तराला पोहोचलय की, मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी त्यांचा स्टार प्रचारक बनलाय, अशी टीका फडणवीस यांनी केली. तर उबाठा सेनेच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे. अरे, शरम वाटली पाहिजे, कोणाचे सुपूत्र आहोत आपण. त्यावर साधा निषेधाचा शब्द नाही, हे लांगुलचालन स्पष्टपणे दिसतय. निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, पण अशी वेळ आली असती, एखादी निवडणूक हरावी लागतेय, म्हणून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरावं लागेल, तर मी निवृत्ती घेतली असती, असं देवेद्र फडणवीस यांनी म्हणत ठाकरेंवर हल्लाबोल केला.