मुंबईकरांनो काळजी घ्या, पुढचे 4 दिवस जरा जपून.. उन्हाचा पारा वाढला अन् महाराष्ट्र तापला, तुमच्या भागात किती तापमान?
मुंबईसह राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे. मुंबईतील तापमानाने 34 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. तर तिकडे चंद्रपुरातलं तापमान 42 अंशांवर पोहोचले आहे. उष्णतेच्या झळा दिवसेंदिवस वाढताहेत. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात उष्णतेची लाट उसळली आहे. मुंबईत जवळपास 34 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तिकडे विदर्भातल्या चंद्रपुरात 42 अंशांवर तापमान गेले आहे. पुण्यात सलग चौथ्या दिवशी पारा 40 अंशांच्या वर गेला. तापमानाचा हा चढा पारा पुढील काही दिवस असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत 34 डिग्री सेल्सिअस, पुणे 40 डिग्री सेल्सिअस, नांगपूर 40.2 डिग्री सेल्सिअस. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 42 अंश सेल्सिअसवर गेलेल्या चंद्रपूरची अतिउष्ण शहर म्हणून नोंद झाली आहे. चंद्रपूरमध्ये उष्णतेची दाहकता पाहता 12 ते 4 या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत असल्याचं पाहायला मिळतंय. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने एप्रिल मे महिन्यात काय होणार असा प्रश्न लोकांना भेडसावतोय. नागपुरातही सलग चौथ्या दिवशी 40 अंश तापमान होतं जे सरासरीपेक्षा पाच अंशांनी जास्त होतं. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात कोरेगाव पार्क आणि ढमढेरे भागांमध्ये 40.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतोय. मार्च महिन्याचा दुसरा आठवडाच नागरिकांना नकोसा झाला आहे. चंद्रपूरमध्ये 42 अंश सेल्सिअस, अकोल्यात 41.3, वर्ध्यात 41 अंश सेल्सिअस, अमरावतीत 40.4 अंश सेल्सिअस, गडचिरोलीत 40 अंश सेल्सिअस असं तापमान पाहायला मिळतंय.