महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटणार? महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात बंदी, 'त्या' मेळाव्याची परवानगी नाकारली, तरीही...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटणार? महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात बंदी, ‘त्या’ मेळाव्याची परवानगी नाकारली, तरीही…

| Updated on: Dec 09, 2024 | 10:52 AM

बेळगावात आज होणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. असे असताना महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बंदी घातल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. बेळगावात आज होणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. असे असताना महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बंदी घातल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे. दरम्यान यानंतर मराठी एकीकरण समिती आपला मेळावा घेण्यावर ठाम आहे. आजपासून कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती आहे. मात्र यानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सीमाभागाचा प्रश्न सुटायला नको, ही कर्नाटकमधील काँग्रेसची भूमिका आहे, असं उदय सामंत म्हणाले. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घातल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा महायुतीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र एककीरण समितीच्या मेळाव्याला परवानगी न मिळाल्याने कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झालाय. मेळाव्याला परवानगी द्यावी अन्यथा कर्नाटकमधील नेत्यांना कोल्हापुरात फिरकू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.

Published on: Dec 09, 2024 10:52 AM