Special Report | विधान परिषदेसाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये साठंलोटं ?
राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची आणि फडणवीस, पाटील यांच्यातही चर्चा सुरु होती. मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूरची जागा देण्यावर एकमत झालं.
मुंबई : राज्यातील 6 विधान परिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सुरु होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे प्रयत्न मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमध्ये फळाला आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, नागपूर आणि अकोल्यात निवडणूक होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुंबईत भाजपचे राजहंस सिंह, तर शिवसेनेचे सुनील शिंदे, कोल्हापुरात काँग्रेसचे सतेज पाटील, तर धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल हे विधान परिषदेवर बिनविरोध जाणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कालपासून दिल्लीत आहेत. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर फडणवीस आणि पाटील यांची वरिष्ठांशी चर्चा झाली. दुसरीकडे राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची आणि फडणवीस, पाटील यांच्यातही चर्चा सुरु होती. मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूरची जागा देण्यावर एकमत झालं.