विधानसभेच्या निकालापूर्वीच महायुती अन् मविआमध्ये मोठ्या हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्….
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर फक्त तीन दिवस सत्ता स्थापनेसाठी आहेत. २६ तारखेला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे, २६ तारखेपर्यंत सरकार स्थापन करावं लागेल.
उद्या सकाळपासूनच विधानसभा निकालाचे आकडे समोर येण्यास सुरूवात होणार आहे. त्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेत सत्तास्थापनेचा विश्वास व्यक्त केलाय. तर सागर बंगल्यावर बैठकीचं सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून १६० च्या आसपासच्या आकड्यांचा दावा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आज दुपारी तातडीची ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सर्व उमेदवारांना विधासनभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, अशा सूचना केल्यात. तर संजय राऊत आणि काँग्रेसनेही १६० ते १६५ जागांचा दावा केलाय. यादरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. महायुतीचं सरकार येणार आणि मनसे सत्तेत असेल असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. तर दुसरीकडे निकाल लागल्यावर फक्त तीन दिवस सत्ता स्थापनेसाठी आहेत. २६ तारखेला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे, २६ तारखेपर्यंत सरकार स्थापन करावं लागेल.