एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार ‘ही’ ९ मंत्रिपदं, संभाव्य खाती आली समोर, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदे यांच्याकडून 12 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती पद मिळावे, यासाठीही शिंदे आग्रही आहेत. या मंत्रिपदामध्ये गृहखाते, नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्यांसह विविध महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप नवीन सरकार स्थापन झालेलं नाही. तर दुसरीकडे भाजपने घटक पक्षांना मुख्यमंत्रिपद देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता महायुतीतच खाती वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून 12 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती पद मिळावे, यासाठीही शिंदे आग्रही आहेत. या मंत्रिपदामध्ये गृहखाते, नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्यांसह विविध महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. मात्र गृहखातं सोडण्यास भाजपने नकार दिल्याने शिंदेंना नेमकी कोणती खाती मिळणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना आता शिवसेनेला ९ मंत्रिपदं मिळणार असल्याची शक्यता असून संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, उद्योग, उच्च आणि तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क, पीडब्ल्यूडी आणि रोजगार हमी ही खाती शिंदे गटाच्या वाट्याला येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाला तूर्तास फक्त 9 खाते मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे, तर गृहमंत्री आणि ओबीसी मंत्रालय भाजप स्वत:कडेच ठेवणार असल्याचंही सूत्रांकडून सांगितले जात आहे.