Eknath Shind Shivsena : महायुतीच्या बैठकीत सेटलमेंट? मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती मंत्रिपदे शिंदेंना मिळणार?
भाजपने गृहमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्यानंतर आता एकनाथ शिंदेंसोबत वाटाघाटी सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपची ऑफर स्वीकारणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे यांनी दावा सोडल्यानंतर आता भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 12 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती पद मिळावे, यासाठीही एकनाथ शिंदे आग्रही आहेत. या मंत्रिपदामध्ये गृहखाते, नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्यांसह विविध महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. मात्र गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमकी कोणती खाती मिळणार? या कडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आज महायुतीच्या बैठकीत खातेवाटपावर शिक्कामोर्तब होणार असून शिंदेंकडून दिल्लीतील बैठकीत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या खात्यांची मागणीपैकी कोणती खाती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती दिली जाणार असल्याची शक्यता आहे.