Amit Thackeray: ‘… अन् माझ्या काकांना वाईट वाटलं’, अमित ठाकरेंचा भर भाषणातून उद्धव ठाकरेंना खोचक टोला
विधानसभा निवडणुकीसाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. सध्या महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. अशातच माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेने राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आणि रविवारी त्यांची जाहीर सभा झाली.
माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत हे विधानसभेच्या रिंगणात आहेत. दरम्यान, अमित ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच जाहीर मंचावरुन भाषण केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत खोचक टोला लगावला, अमित ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली. यानंतर तीन तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला. त्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं मी कसा मागे पडलो. एक-दोन दिवसात त्यांचाही उमेदवार जाहीर झाला. तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन संदीपजींना केला, आताही संदीप देशपांडे सरांना विचारु शकता, कुठे तरी बातम्या दाखवत होते, की आम्ही वरळीमधून माघार घेतली, तर ते माहीममधून मागे हटतील, फक्त बातम्या येत होत्या, खरं खोटं माहिती नाही. पण मी संदीपजींना सांगितलं, आपण माघार घ्यायची नाही. आपण उतरलोय जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच, असा निर्धारही अमित ठाकरेंनी बोलून दाखवला.