सदा सरवणकरांची माघार नाहीच, स्पष्टच म्हणाले, ‘ठासून सांगतो…विधानसभा लढणार आणि जिंकणार’
'वेळोवेळी सांगितलं उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मी ठामपणे सांगितलं, ठासून सांगितलं मी माघार घेणार नाही.', असे म्हणत सदा सरवणकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यंदा माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होताना दिसणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत. यासोबत ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना तिकीट दिलं आहे. दरम्यान, मनसेने लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सरवणकरांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातोय. मात्र निवडणूक लढण्यावर सदा सरवणकर ठाम असल्याचे पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. माहीम मतदारसंघातून माघार घेणार नाही, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय तर विधानसभा निवडणुकीतून माघार घेणार नाही, ठासून सांगतो, लढणार आणि जिंकणार असा विश्वासच सदा सरवणकर यांनी व्यक्त केला. इतकंच नाहीतर मी लढणारा शिवसैनिक मागच्या दाराने जाणारा नाही, असेही सदा सरवणकर यांनी म्हटले आहे.