नादच खुळा… अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा? खास आहे तरी काय?
माळेगावच्या यात्रेत कोंबड्यांची चर्चा , अँड्रॉइड आणि आयफोनपेक्षाही महाग किमतीचे कोंबडे असल्याचे होतेय चर्चा
दक्षिण भारतात प्रसिध्द असलेली नांदेड जिल्ह्यात खंडोबाची यात्रा दरवर्षी भरत असते. यंदाही नांदेड जिल्ह्यात खंडोबाच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथे ही यात्रा भरते. या यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. माळेगावच्या यात्रेत मोठ्या प्रमाणात पशु आणि प्राण्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतं असतात. सर्वात लहान प्राण्यांपासून ते सर्वात मोठे प्राणी येथे विक्रीसाठी आणले जातात. परंतु यात्रेमध्ये इतर प्राण्यांपेक्षा कोंबड्याची चर्चा जरा जास्तच होत आहे. या कोंबड्यांची चर्चा होण्याचं कारणही तसंच आहे. कारण या कोंबड्यांची किंमत एखाद्या अँड्रॉइड फोन आणि आयफोनपेक्षाही महाग आहे. साडेचार किलो वजन आणी अडीच फूट उंची असलेले हे लाल तुर्याचे कोंबडे 25 ते 30 हजार रूपये किमतीचे आहेत. तर यापेक्षा अधिक किमतीचेही कोंबडे येथे आहेत. या फायटर कोंबड्याच्या किंमतीमुळे माळेगाव यात्रेत फक्त कोंबड्याचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.