मोकळं तर माघारी जायचंच नाही गड्या, सगे सोयऱ्यांबाबत जरांगे काय म्हणाले
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सहा दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीतून निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे भगवे वादळ मुंबईच्या वेशीवर ठेपले आहे. सरकारने शिष्ठमंडळ पाठवून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतू मनोज जरांगे यांनी सगे सोयरे बाबत अध्यादेश मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण 100 टक्के मोफत करण्यात यावे अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रावर आरक्षण मिळण्यासाठी सरकारने जीआर काढावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. मराठ्यांना संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत सरकारने नोकर भरती करू नये आणि जर नोकर भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवून करायची असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देताना म्हटले आहे. मराठा आरक्षणावर क्युरेटीव्ह पिटीशन माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर निकाल लागेपर्यंत सरकारने सगे सोयरे कुणबी आरक्षणातून सुटू नयेत यासाठी जीआर काढावा. तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचा आजचा मुक्काम नवीमुंबईतच रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.