निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले, ‘फडणवीसांनी खुन्नस दिली, शेवटी मराठ्यांचं वाटोळं केलं’
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची नुकताच घोषणा करण्यात आली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
‘मराठा आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम सरकार करणार नाही असं वाटत होतं. पण सरकारने आम्हाला फसवलं. आंदोलन आणि मराठा समाज एक ठेवायचा नाही, त्यांना आरक्षण द्यायचं नाही. मराठा समाज बलाढ्य आहे, त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. मराठ्यांची पोरं भिकारी राहिले पाहिजे. ते पुढे येता कामा नये हे वचन देवेंद्र फडणवीस यांनी उचललं होतं. सत्ता मात्र मराठ्यांनी दिली’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून फडणवीस यांनी काम केलं आणि मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे या तत्त्वाने द्वेषाने आणि आकसाने फडणवीस मराठ्यांशी वागले. त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. निर्णय घ्यायचं त्यांच्या हातात होते. सत्ता त्यांच्या हातात होती. मराठ्यांना डिवचण्याचं काम केलं. मराठ्यांच्या नशिबाला हात घातला. ओबीसीमध्ये नव्या १७ जाती घातल्या पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. ही खुन्नस फडणवीस यांनी दिली. हे मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे लक्षात आलं होतं. कारण आम्ही एवढे गाफील नाही. आम्हाला कळत होतं. पण क्षत्रियांचा धर्म असतो शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवा. काहीही घडू शकतो. या भूमिकेतून आम्ही विश्वास ठेवला. कारण लढाईत शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं. पण शेवटी त्यांनी करायचं तेच केलं. त्यांच्या पोटात जे बरबटलेले विचार होते ते बाहेर आणलेच. शेवटी आचारसंहिता करून मराठ्यांचं वाटोळं केलं’, असा हल्लाबोलही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.