मराठ्यांना फसवलं तर पुन्हा.. मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा
शिंदे सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २० फेब्रुवारी रोजी एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनादरम्यान मराठ्यांसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले....
जालना, १६ फेब्रुवारी २०२४ : मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळत असलं तरी जोपर्यंत सगेसोयऱ्यांचा कायदा होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. दरम्यान, शिंदे सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २० फेब्रुवारी रोजी एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनादरम्यान मराठ्यांसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, २० फेब्रुवारीपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असून अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात कोणता निर्णय घेतला जातो. हे पाहून पुढची भूमिका ठरविली जाईल असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. शिंदे-फडणवीस यांचा काही गोड गैरसमज असला, की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण आणि ज्यांच्या नाही त्यांना नवा कायदा असेल… पण आम्हाला हे नको तर सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी पाहिजे. त्यासाठी गोरगरिब लढलाय. त्यामुळे सगेसोयऱ्यांचा कायदा करून बाकीच्या मराठा समाजालाही कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग सरकारने मोकळा करून द्यावा, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.