…तर मंडल कमिशन चॅलेंज करणार मी, जरांगे पाटील यांनी दिला इशारा
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा उभा संघर्ष पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चला मुंबईचा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने कुणबी सगेसोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला. त्यानंतर हे आंदोलन जरांगे पाटील यांनी तुर्तास मागे घेतले आहे. परंतू या निर्णयाने ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या कायद्याला आव्हान देणार असे म्हटले आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे.
मुंबई | 29 जानेवारी 2024 : राज्यात मराठा विरुध्द कुणबी संघर्ष पेटला आहे. मराठा समाजातील सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र जारी करण्याच्या अध्यादेशावरुन हा संघर्ष पेटला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी आपल्या निवासस्थानी सर्व पक्षीय बैठक घेतली आहे. या अध्यादेशावर हरकती घेण्यासह कोर्टात जाण्याची तयारी त्यांनी केली आहे. हा कायदा टिकविण्याची जबाबदारी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची आहे. तशा त्यांच्या सह्या माझ्याकडे आहेत असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. अध्यादेशाबाबत जर काही दगाफटका झाला तर मी मंडल कमिशन चॅलेंज करेल असे पाटील यांनी म्हटले आहे. मी जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत यांना कितीही कोर्टात जाऊ द्या मी माझ्या मराठ्यांसाठी पुन्हा लढा उभा करेल असेही त्यांनी रायगड येथे जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांना काहीही करु द्या, मी जे करायचं तेच करतो असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.